धरणगाव (प्रतिनिधी) सट्टा पेढी चालवायची काहींना दिलेली गपचूप परवानगी आणि काहींना साहेबांनी नाही सांगितल्याचा निरोप,यावरून दोन नंबरवाल्यांमध्ये अंतर्गत धूसफूस सुरु झालीय. यामुळे शहरातील वातावरण गढूळ झाले आहे. हा विषय थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ना.गिरीश महाजन यांच्या कानावर घालणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड.संजय महाजन यांनी दिलीय.
या संदर्भात अधिक असे की, चोपडा विभागीय पोलीस अधिकारी सौरभ अग्रवाल यांनी पदभार स्वीकारल्या पासून चोपडा रेंजमधील अवैध धंदे पूर्णपणे बंद झाले होते. खासकरून धरणगावात पडलेल्या धाडीनंतर तर दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांचे धाबेच दणाणले होते. परंतू सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार धरणगावात सेक्शन घेत काही जणांना सट्टा पेढी चालवण्याची गपचूप परवानगी दिल्याची चर्चा काही दिवसापासून सुरु आहे. तर काहींना परवानगी नाकारण्यात आल्यामुळे धरणगावातील सट्टा पेढी चालविणाऱ्या काही जणांमध्ये स्पर्धा सुरु झालीय. इतरांना परवानगी देताय, मग आम्हालाच का नाही?, हेच नेमके धुसफूस वाढण्याचे कारण सांगितले जात आहे.
या संदर्भात भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड.संजय महाजन यांनी सांगितले की, हा विषय आपल्या देखील कानावर दोन-तीन दिवसापूर्वी आलाय. परंतू हा विषय इतका गंभीर असेल असे वाटले नव्हते. आपल्या गावात कुठल्या परिस्थितीत शांतता नांदली पाहिजे. पक्षाच्या बैठकीनिमित्त पुढील आठवड्यात मुंबई येथे गेल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ना.गिरीश महाजन यांची भेट घेत संपूर्ण विषय सांगणार आहे. आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता गावातील अवैध धंदे बंद होणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका असल्याचे देखील अॅड.महाजन यांनी सांगितले. दरम्यान, अॅड.महाजन धरणगावमधील अवैध धंद्यांचा विषय थेट मुख्यमंत्र्यापर्यंत नेणार असल्यामुळे या विषयाचे गांभीर्य वाढले आहे.