मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । नगरपरिषदांतील सत्तास्थापनेसाठी झालेल्या अनपेक्षित राजकीय युतींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अकोटमध्ये भाजप–MIM तर अंबरनाथमध्ये भाजप–काँग्रेस युती झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत अशा कोणत्याही आघाड्या सहन केल्या जाणार नाहीत, असे ठामपणे सांगितले आहे.

अकोट नगरपरिषदेत सत्तेसाठी भाजपने MIM ला सोबत घेत ‘अकोट विकास मंच’ स्थापन केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या मंचामध्ये भाजपसह MIM, शिंदेंची शिवसेना, ठाकरे गटाची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती सहभागी झाली आहे. या आघाडीची अधिकृत नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून, भाजपचे नगरसेवक रवी ठाकूर या आघाडीचे गटनेते असतील. या सर्व नगरसेवकांना आता भाजपचा व्हिप पाळावा लागणार असून, १३ जानेवारी रोजी होणाऱ्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी एकत्रित मतदान करणार आहे.

अकोट नगरपरिषदेत भाजपच्या माया धुळे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या असल्या तरी ३५ सदस्यांच्या सभागृहात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. भाजपला सर्वाधिक ११ जागा मिळाल्या, तर MIM ला ५ जागा मिळाल्या. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपने MIM सोबत हातमिळवणी केल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका सुरू केली आहे.
दुसरीकडे, अंबरनाथ नगरपरिषदेत सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट युती झाली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही हातमिळवणी झाल्याचा आरोप केला जात आहे. भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या असून, भाजपकडे बहुमत नसतानाही काँग्रेस आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या मदतीने ३२ नगरसेवकांचा गट उभा करण्यात आला. या युतीमुळे मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाला सत्तेबाहेर राहावे लागले आहे.
एकीकडे देशपातळीवर भाजपकडून ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा केली जात असताना, स्थानिक पातळीवर मात्र सत्तेसाठी काँग्रेससोबत युती केल्याने भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपवर दुटप्पी राजकारणाचा आरोप केला असून, शिंदे गटानेही या युतीला ‘अभद्र’ ठरवत जोरदार टीका केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी भाजपने काँग्रेसशी हातमिळवणी करून शिवसेनेचा घात केल्याचा आरोप केला आहे.
या संपूर्ण घडामोडींवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट भूमिका मांडली. काँग्रेस किंवा MIM सोबत कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नाही, असे सांगत त्यांनी स्थानिक पातळीवर जरी अशी युती झाली असेल तरी ती चुकीची असल्याचे नमूद केले. ज्यांनी अशा आघाड्या केल्या आहेत, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.



