जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत निर्णायक आघाडी मिळवण्याच्या उद्देशाने महायुतीने प्रचाराची गती वाढवली असून, याच पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा भव्य रोड शो जळगाव शहरात आयोजित करण्यात आला आहे. या रोड शोमुळे महायुतीच्या प्रचाराला नवी उर्जा मिळणार असून, शहरातील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे.
दुपारी ठीक ३ वाजता हा रोड शो छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरू होणार असून, नेहरू चौक, लालबहादूर शास्त्री टॉवर, चित्रा चौक, गोलाणी मार्केट या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथेच त्याचा समारोप होणार आहे. या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस नागरिकांशी थेट संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन करणार आहेत.

महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांनी एकत्र येत महायुतीच्या माध्यमातून ताकद दाखवली आहे. या रोड शोमध्ये महायुतीचे सर्व ७५ उमेदवार, प्रमुख नेते, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार असून, जळगाव शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
हा रोड शो केवळ निवडणूक प्रचारापुरता मर्यादित नसून, जळगाव शहराच्या विकासाबाबतचा विश्वास आणि भविष्यातील प्रगतीचा संकल्प असल्याचे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. व्यापारी, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये या रोड शोबाबत मोठी उत्सुकता असून, मार्गावर ठिकठिकाणी स्वागताची तयारी सुरू आहे.
महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला भक्कम पाठिंबा द्यावा, असे आवाहन भाजप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख (जळगाव जिल्हा महानगर) मनोज भांडारकर यांनी केले आहे.



