नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशात करोनाचे संकट घोंघावत असून भारतीय अर्थव्यवस्थेवर देखील या संकटाचा मोठा परिणाम झाला आहे. जीडीपी तीव्र गतीने २४ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहे. आज बुधवारी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक जुने ट्विट शेयर करत मोदींवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या जुन्या ट्विटमध्ये जे म्हटले आहे, तेच मी पंतप्रधानांना सांगू इच्छित आहे, असे पी. चिदंबरम यांनी लिहिले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सन २०१३ मधील जुने ट्विट शेअर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते, ‘अर्थव्यवस्था संकटात, तरुणांना नोकरी हवी आहे, अशात राजकारणावर नाही तर अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करा. चिदंबरमजी, तत्काळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या वेळी ट्विट केले त्या वेळी पी. चिदंबरम हे केंद्रात अर्थमंत्री होते.
चिदंबरम यांनी बुधवारी ट्विट करत पीएम केअर्स फंडाबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. पीएम केअर फंडाला २६ ते ३१ मार्च या केवळ ५ दिवसांमध्ये ३०७६ कोटी रुपये मिळाले असल्याचे ऑडिटर्सनी स्पष्ट केले आहे. ज्या लोकांनी पीएम केअर्स फंडाला मदत केली, त्या दयाळू दात्यांची नावे मात्र प्रसिद्ध केली गेली नाहीत, . इतर सर्व एनजीओंना एका मर्यादेनंतर पैसा वाढल्यानंतर दानकर्त्यांची नावे प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. या जबाबदारीतून पीएम केअर्स फंडाला मुक्त का करण्यात आले आहे?, ज्याला दान मिळाले आहे तो सर्वांना माहीत आहे, मात्र ज्यांनी दान दिेल आहे, त्याच्याबाबत मात्र कोणालाही माहिती नाही. ट्रस्टी दात्यांची नावे जाहीर करण्यास का घाबरत आहेत?, असे प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केले आहेत.