
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीला आता वेग आला असून शहरात राजकीय समीकरणे नव्याने आकार घेऊ लागली आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. छायाताई पाटील यांच्या प्रचाराला सर्वस्तरातून मिळणारा वाढता प्रतिसाद हे निवडणुकीतील महत्त्वाचे ठळक वैशिष्ट्य ठरत आहे.

शहरातील विविध प्रभागांत फिरणाऱ्या प्रचारफेऱ्यांदरम्यान छायाताई पाटील यांना महिलांपासून युवकांपर्यंत तसेच व्यावसायिक, सामाजिक संघटनांकडूनही उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीही आपापल्या पद्धतीने जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली असून, मतदारांपर्यंत पक्षाची धोरणे आणि उमेदवारांची भूमिका पोहोचवण्याचे काम गतीमान झाले आहे.
दरम्यान, उभारलेल्या राजकीय वातावरणात उबाठ्याचे उमेदवार व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी काल झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी या आरोपांना निव्वळ राजकीय डावपेच ठरवत स्वतःवरील आरोप निराधार असल्याचा दावा केला. निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचे आरोप होत असले तरी नागरिकांनी विकासकामांच्या आधारेच निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.



