Home Cities यावल छाया पाटील यांनी स्वीकारला यावल नगराध्यक्षपदाचा पदभार

छाया पाटील यांनी स्वीकारला यावल नगराध्यक्षपदाचा पदभार

0
171

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार म्हणून दणदणीत विजय मिळवल्यानंतर आज सौ. छाया अतुल पाटील यांनी अधिकृतपणे नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. सोमवार, दिनांक २९ डिसेंबर रोजी पार पडलेल्या या शपथग्रहण सोहळ्यामुळे यावलच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले.

शेकडो समर्थक, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत सौ. छाया पाटील यांनी नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. निवडणूक निकालानंतर प्रथमच शहरात मोठ्या प्रमाणावर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विजयाचा आनंद साजरा करताना समर्थकांनी घोषणाबाजी करत नव्या नेतृत्वाकडून विकासाची अपेक्षा व्यक्त केली.

या प्रसंगी माजी आमदार रमेश चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी, शिवसेनेचे उपनेते व संपर्क प्रमुख संजय सावंत, भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे निवडून आलेले नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सौ. छाया पाटील यांचे अभिनंदन करून आगामी काळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सौ. छाया पाटील यांनी नागरिकांचे आभार मानत, यावल शहराच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे स्पष्ट केले. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व मूलभूत सुविधा बळकट करण्यावर भर दिला जाईल, तसेच सर्व घटकांना सोबत घेऊन पारदर्शक कारभार केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीच्या विजयामुळे यावल नगरपालिकेत सत्तांतर झाले असून, नव्या नेतृत्वाकडून विकासाभिमुख आणि लोकहिताचे निर्णय अपेक्षित आहेत. शहराच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

यावल नगरपालिकेच्या नव्या नगराध्यक्षपदी सौ. छाया पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound