मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित थीम पार्क जळगाव येथे उभारण्यात येणार असल्याची घोषणा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेमध्ये केली. नाशिक जिल्ह्यातील निफाड, पिंपळगाव, येवला येथे शिवसृष्टी प्रकल्प सुरू असतानाच, आता जळगावमध्येही हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार आहे.
यावेळी देसाई यांनी सांगितले की, राज्य सरकारने या प्रकल्पासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली होती. या समितीच्या शिफारशींनुसार नाशिक ऐवजी जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत घोषणा केली की, गमेश्वर येथे ज्या ठिकाणी सरदेसाई यांच्या वाड्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आले होते, त्या ठिकाणी त्यांचे यथोचित स्मारक उभारण्यात येईल. यासंदर्भात विधान परिषदेत झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य प्रवीण दरेकर, अमोल मिटकरी, पंकज भुजबळ, भावना गवळी आणि प्रसाद लाड यांनी सहभाग घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्यातील पाच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाच्या महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित डिजिटल थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचबरोबर, रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला जिजामाता वाडा 350 वर्षांपूर्वी जसा होता तसा उभा करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणीही शिवसृष्टी विकसित होणार आहे. तसेच सिंदखेड राजा येथे जिजामाता यांचे जन्मस्थान विकसित केले जाणार आहे. उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचेही मंत्री देसाई यांनी सांगितले. ही सर्व विकासकामे राज्य सरकारच्या पर्यटन धोरणांतर्गत होत असून, यामुळे महाराष्ट्रातील ऐतिहासिक पर्यटनाला नवी चालना मिळेल.