जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भारावलेल्या वातावरणात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव करताना, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजे नसून ते आपल्या सर्वांचे श्वास आणि प्राण आहेत,” असे भावनिक उद्गार काढले. त्यांच्या या विधानाने उपस्थित शिवभक्तांमध्ये प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, शिवरायांचा इतिहास जागतिक स्तरावर प्रेरणादायी असून त्यांचे धैर्य, शौर्य आणि स्वराज्याची संकल्पना प्रत्येक पिढीला दिशा देणारी आहे. जळगावमधील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती गेल्या २६ वर्षांपासून सर्व समाजघटकांना एकत्र आणून सामाजिक एकात्मतेची परंपरा जोपासत असल्याबद्दल त्यांनी समितीचे विशेष कौतुक केले. शिवजयंती हा केवळ एक सोहळा नसून राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणारा उत्सव असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
याप्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महापुरुषांना जाती-धर्माच्या चौकटीत न अडकवण्याचे आवाहन केले. शिवरायांनी सर्व समाजासाठी कार्य केले असून त्यांनी दिलेल्या स्वाभिमानामुळेच आपण आज ताठ मानेने जगत आहोत, असे त्यांनी नमूद केले.

या सोहळ्याला महापौर दिपमाला काळे, आमदार सुरेश भोळे, उपमहापौर मनोज चौधरी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, उद्योगपती अशोक जैन यांच्यासह अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी सादर केलेले जिवंत देखावे विशेष आकर्षण ठरले. समितीचे समन्वयक शंभू पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.



