मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | छगन भुजबळांबद्दल खोटा दावा करून मला वातावरण बिघडवायचे नाही. त्यांचा आणि ठाकरे गटाचा काहीही संपर्क झालेला नाही अशी स्पष्ट भूमिका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. तसेच ते आमच्या पक्षात टिकून राहिले असते तर आज मुख्यमंत्री झाले असते ते म्हणाले. मंत्री छगन भुजबळ हे सध्या नाराज असून ते ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यावरूनच राऊतांनी आज प्रसार माध्यमांशी बोलतांना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
संजय राऊत छगन भुजबळ यांच्याबाबत बोलताना म्हणाले, ”पूर्वी एकेकाळी छगन भुजबळ शिवसेनेत होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसनंतर ते शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले आणि आता ते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. आता त्यांचे शिवसेनेची कोणतंही नाते उरलेले नाही. त्यामुळे ते शिवसेनेत येण्याबद्दल ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्या खोट्या आहेत”, असे राऊत म्हणाले.
पुढे संजय राऊत म्हणाले की, ”भुजबळ शिवसेनेत येण्याची चर्चा खोटी असून सर्व बातम्या चुकीच्या आहेत. आमच्यात कुठलीही चर्चा नाही. छगन भुजबळांबद्दल खोटा दावा करून मला वातावरण बिघडवायचे नाही. ते शिवसेनेत होते तेव्हा मोठे नेते होते, ते आमचे नेते होते. ते आमच्या पक्षात टिकून राहिले असते तर आज मुख्यमंत्री झाले असते. किंवा ते कुठल्याही दुसऱ्या एका पक्षात टिकून राहिले असते तर ते राजकारणात खूप पुढे गेले असते”, असे म्हणत संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे.