नाशिक | राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अमाप अपसंपदा असून यातून त्यांनी मुंबईत नऊ मजली इमारत उभारल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी भुजबळांच्या संपत्तीची माहिती द्यावी असे आव्हान देखील त्यांनी येथील पत्रकार परिषदेत केले.
किरीट सोमय्या यांनी आज नाशिक येथील पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केलेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईत नऊ मजली इमारत बांधली आहे. या इमारतीत संपूर्ण भुजबळ कुटुंब राहत आहे. मात्र, कागदावर परवेज कन्स्ट्रक्सशनची मालकी दाखवली आहे. त्यामुळे भुजबळांनी या परवेजशी आणि इमारतीशी काय संबंध आहे हे स्पष्ट करावं, या परवेजला भुजबळ राहण्याचं भाडं देतात का? की त्यांच्याकडून ही इमारत विकत घेतली आहे, याचा खुलासाही भुजबळ यांनी करावा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली. तसेच येत्या शनिवारी या इमारतीची पाहणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
आर्मस्ट्राँ इन्फ्रा, आर्मस्ट्राँ एनर्जीने मालेगावमधली गिरणा शुगर मिल विकत घेतली. गिरणा शुगर मिल ही भुजबळांची दुसरी बेनामी मालमत्ता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माझं चॅलेंज आहे. त्यांनी भुजबळाच्या इमारतीचे मालक कोण? हे सांगावं, असं आव्हानच सोमय्या यांनी दिलं.यावेळी मालेगाव, खारदांडा, पनवेल या ठिकाणी छगन भुजबळ यांची प्रचंड प्रमाणात बेनामी संपत्ती आहे, असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांच्या संपत्तीपैकी एका ठिकाणी भेट दिल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच शनिवारी आपण भुजबळांच्या राहत्या घरी भेट देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.