जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा व तालुका मेडिकल डीलर्स असोसिएशनतर्फे केमिस्टभूषण सुनील भंगाळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जोपासत आणि आरोग्य क्षेत्रातील सेवाभाव जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला औषध व्यवसायिकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या रक्तदान शिबिराचे आयोजन इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्त केंद्र यांच्या सहकार्याने करण्यात आले. वैद्यकीय तज्ज्ञांच्या उपस्थितीत रक्तदात्यांची तपासणी करून सुरक्षित पद्धतीने रक्तसंकलन करण्यात आले. विविध वयोगटातील रक्तदात्यांनी स्वेच्छेने सहभाग नोंदवत रक्तदान केले, ज्यामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यावेळी सुनील भाऊ भंगाळे यांची ‘वही तुला’ आणि ‘औषधी तुला’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. वाढदिवसानिमित्त पारंपरिक केक कापण्याऐवजी समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देत हा अभिनव उपक्रम साजरा करण्यात आला. जमा झालेल्या वह्या आणि औषधी साहित्य लवकरच गरीब व गरजू रुग्णांना तसेच विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
मेडिकल डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोग्य क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येकाने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून अशा उपक्रमांमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. रक्ताची कमतरता भासणाऱ्या रुग्णांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार असून, भविष्यातही अशा समाजहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.



