वृद्ध महिलेची फसवणूक; दागिने चमकवण्याच्या बहाण्याने चैन व अंगठ्या लांबविल्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अयोध्या नगरातील एका वृद्ध महिलेला सोने-चांदीचे दागिने पॉलिश करून देतो असे सांगून अज्ञात दोन भामट्यांनी तब्बल ३२ हजार रुपये किमतीचे दागिने लांबवल्याची घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, लताबाई पारसमल जैन (वय ६५, रा. अयोध्या नगर, जळगाव) या गुरुवारी (६ फेब्रुवारी) दुपारी १ वाजता घरी असताना अज्ञात दोन जण त्यांच्या घरी आले. त्यांनी “तुमचे सोने-चांदीचे दागिने चमकवून देतो” असे सांगितले. लताबाई जैन यांनी सोन्याची चैन आणि दोन अंगठ्या त्यांना दिल्या. त्यानंतर भामट्यांनी एका भांड्यात पाणी गरम करून दागिने टाकले आणि हातचलाखीने दागिने गायब केले. यानंतर ते लगेचच तिथून निघून गेले. काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचे वृद्ध महिलेला लक्षात आले. लताबाई जैन यांनी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, अज्ञात दोन व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहेत.

Protected Content