सावदा, प्रतिनिधी | सौदी अरब येथे उमराह यात्रेस घेऊन जाण्याच्या बहाण्याने येथील एका मजुरास दोघा भामट्यांनी १ लाख ३४ हजार रुपयांना फसविल्याची घटना घडली असून त्यांच्याविरोधात सावदा पोलीस स्टेशनमध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल फिर्यादीनुसार, शेख अश्फाक शेख असलम पिंजारी (वय २२, रा.शेखपुरा, सावदा) यांना नातेवाईकांसह १९ ऑगस्ट २०१८ रोजी सौदी अरब येथे उमराह यात्रेस घेऊन जातो असे सावदा येथील अब्दुल कादीर खान युसूफ खान, शेख नाजीम शेख ताज यांनी सांगितले. या यात्रेस जाण्यासाठी ३ तिकिटांचे १ लाख ३४ हजार रुपयांची मागणी पिंजारी यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी ही रक्कम चेक व रोख स्वरुपात आरोपींना दिले. मात्र, पिंजारी व त्यांच्या नातेवाईकांना यात्रेस घेऊन न गेल्याने त्यांनी तिकिटाचे पैसे आरोपींकडे परत मागितले असता दोघांनी त्यांना पैसे परत न करता दमदाटी केली. यामुळे पिंजारी यांनी सावदा पोलिसांत अब्दुल कादीर खान युसूफ खान, शेख नाजीम शेख ताज या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एपीआय राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आर. डी. पवार करत आहेत.