यावल (प्रतिनिधी) येथील शहरातील परिसरात फिरून दागीन्यांची पॉलीश करून देण्याच्या नावाखाली दागीने घेऊन पसार होण्याच्या बेतात असणाऱ्या एका भामटयास तरूणांनी चांगलाच चोप देऊन पोलीसांच्या स्वाधीन केल्याची शहरात घडलीय. याबाबत यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्मात मिळालेली माहिती अशी की, आज दिनांक ३१ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सुमारास यावल शहरातील सुतारवाडा परिसरात राहणाऱ्या जनाबाई संजप बारी (वय ४५) यांना एका भामट्याने विश्वासात घेत जुने चांदीचे दागीने पॉलीश करून चमकवून देतो, असे सांगितले. मात्र, दागिने हातचलाखीने भामटा पसार होण्याच्या तयारीत असतांनाच जनाबाई यांच्या लक्षात सगळा प्रकार आला. त्यानंतर परिसरातील तरुणांच्या मदतीने त्याला पकडून चांगला चोप देत पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत या भामटयाने आपले नाव शर्वण कुमार असल्याचे सांगीतले असून तो पुर्णीया बिहार येथील रहिवाशी असल्याचे सांगीतले. जनाबाई संजय बारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शर्वणकुमार या भामट्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या भामटयाने शहरातील इतर महीलांची दागिने पॉलीश करून देण्याच्या नावाखाली फसवणुक केली असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अशा भामट्यांकडून सावध राहण्याचा ईशारा पोलीसांनी दिला आहे.