Home अर्थ सहा महिन्यांपासून थकीत कमिशन न मिळाल्याने स्वस्त धान्य दुकानदार आर्थिक कोंडीत

सहा महिन्यांपासून थकीत कमिशन न मिळाल्याने स्वस्त धान्य दुकानदार आर्थिक कोंडीत


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागांतील शेकडो स्वस्त धान्य दुकानदार सध्या आर्थिक संकटात सापडले आहेत. मागील सहा महिन्यांपासून शासकीय वितरणाचे कमिशन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

सततच्या थकबाकीमुळे स्वस्त धान्य दुकानदार आर्थिक दृष्ट्या कोलमडले असून या गंभीर समस्येबाबत शासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही, यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. धान्य वितरण ही जबाबदारी वेळेवर पार पाडावी लागते, मात्र त्यासाठी लागणाऱ्या कमिशनचा निधीच वेळेवर न मिळाल्याने दुकानदार अडचणीत सापडले आहेत. त्यातच अलीकडे शासनाने ई-केवायसी प्रक्रिया सक्तीची केली असून, त्यामध्ये देखील मोठ्या अडचणी येत आहेत.

यावल तालुक्यात सध्या केवळ ४० ते ५० टक्केच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, कारण:शासनाच्या ॲप्स नीट काम करत नाहीत, अनेक लाभार्थ्यांचे आधारशी मोबाईल क्रमांक संलग्न नाहीत, आणि सतत सर्व्हर डाऊन राहतो. या त्रासदायक प्रक्रियेमुळे दुकानदारांना तणावाखाली काम करावे लागत आहे. यामुळे स्वस्त धान्य वितरणास विलंब होत आहे, तर दुसरीकडे शासनाकडून निधी न मिळाल्याने ते पुन्हा आर्थिक अडचणीत सापडत आहेत.

आदिवासी व दुर्गम भागांमध्ये ही समस्या अधिक तीव्र असून, तिथे कमिशन थकीत राहिल्यामुळे दुकानांमध्ये धान्य वितरणावरही परिणाम होत आहे. याबाबत अनेक स्वस्त धान्य दुकानदारांनी आवाज उठवला असून, “शासनाने त्वरीत कमिशन वाटप करावे व ई-केवायसीसाठी योग्य उपाययोजना कराव्यात” अशी मागणी जोर धरू लागली आहे.

“आम्ही लोकांना वेळेवर धान्य द्यायचं, पण आम्हाला वेळेवर पैसे मिळत नाहीत. अशा परिस्थितीत आमचं दुकान कसं चालवायचं?” – एका स्वस्त धान्य दुकानदाराचे संतप्त वक्तव्य. शासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन, स्वस्त धान्य दुकानदारांना दिलासा देणारे उपाय अमलात आणावेत, अशी मागणी सर्वत्र होत आहे.


Protected Content

Play sound