महाराजांचे स्मारक व्हावे, ही त्यांचीच इच्छा नाही – चंद्रकांत पाटील यांचा आरोप

0chandrakant

मुंबई, वृत्तसंस्था | हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकाचा मुद्दा चर्चेत आला आहे. शिवस्मारकाच्या कामात अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्याची चौकशी सुरू असून, भाजपाने त्यावर उत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रविवारी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी शिवस्मारकाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, शिवस्मारकाच्या कामात अनियमितता झाल्याच्या काही तक्रारी आलेल्या आहेत. त्याची चौकशी करण्यात येईल. जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल, असे ठाकरे यांनी सांगितले होते.

 

मुख्यमंत्र्यांच्या मुद्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर खुलासा केला आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला उपस्थित असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाटील म्हणाले,”छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भामध्ये अजिबात अनियमितता झालेली नाही. कुणाच्या फायद्यासाठी निविदा बदलण्यात आली नाही. ज्यांनी १५ वर्ष शिवस्मारक केले नाही, तेच आता पुन्हा ते होऊ नये, याच्या मागे लागले आहेत. मुळात महाराजांचे स्मारक व्हावे, ही त्यांचीच इच्छा नाही. निविदेत सरकारचे पैसे वाचविले आहेत. ३८०० कोटींची निविदा २५०० कोटींवर आणली. त्यात घोटाळा कसा ?,” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व निर्णय मुख्य सचिवांच्या अध्यक्षते खालील उच्चाधिकार समितीने घेतलेले आहेत. त्यात इतरही सचिवांचा समावेश होता. स्मारकाचे काम आम्ही सुरू केले तरी अजून पेमेंट झालेले नाही. त्यामुळे घोटाळ्याचा प्रश्नच निर्माण होत नाही,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Protected Content