
मुंबई (वृत्तसंस्था) नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयशी ठरल्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार असतील, असे महत्त्वपूर्ण विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे हे तिन्ही नेते राज्यांचे मुख्यमंत्री राहिले होते. पवार पुढे म्हणाले, पंतप्रधान बनण्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री होते. माझ्या मते एनडीएला बहुमत मिळवण्यात अपयश आल्यास ममता, नायडू आणि मायावती पंतप्रधानपदासाठी चांगला पर्याय ठरू शकतात. तसेच ममता यांना पंतप्रधान करण्यासाठी शिवसेनाही पाठिंबा देऊ शकते, असेही पवार म्हणाले आहेत. दरम्यान,परंतु पवारांना आपल्या यादीत राहुल गांधींचं नाव न ठेवल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राहुल गांधींनी अनेक वेळा सांगितले आहे की, मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, याचा उल्लेखही पवारांनी केला आहे. पण हे तिन्ही नेते राहुल गांधींपेक्षा चांगले पंतप्रधान ठरू शकतात का? असा विचारलेल्या प्रश्नावर पवारांनी मौन साधले.काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर पवारांच्या ताज्या विधानावर भाष्य केले. एनडीए फेल ठरल्यास पर्याय म्हणून महाआघाडी झाली नाही तरी ‘एनडीए’तर अन्य पक्षांना एकत्र आणण्यात पवारांची भूमिका महत्त्वाची ठरेल. मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पवार सर्व डाव खेळतील. पवारांच्या प्रस्तावाला ऐनवेळी शिवसेनेचाही पाठिंबा मिळू शकतो, असे हा नेता म्हणाला.