Home Cities जळगाव चंदन पाटील राज्यस्तरीय ‘ज्ञानवंत पत्रकार’ पुरस्काराने सन्मानित

चंदन पाटील राज्यस्तरीय ‘ज्ञानवंत पत्रकार’ पुरस्काराने सन्मानित


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । निर्भीड, अभ्यासू आणि समाजाभिमुख पत्रकारितेच्या जोरावर ऑनलाईन माध्यम क्षेत्रात ठसा उमटवणारे चंदन पाटील यांना राज्यस्तरीय “ज्ञानवंत पत्रकार” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या गौरवामुळे जिल्ह्यासह पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जनमत प्रतिष्ठानमुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळा व बक्षीस वितरण समारंभ रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी जळगाव येथील अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

या सोहळ्यात उत्कृष्ट पत्रकारिता क्षेत्रातील कामगिरीबद्दल ऑनलाईन मीडिया ‘पोलीस दक्षता लाईव्ह’ चे संपादक श्री. चंदन पाटील यांना “ज्ञानवंत पत्रकार” पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या वर्षभरात त्यांनी आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सामाजिक, प्रशासकीय आणि सार्वजनिक प्रश्नांवर परखडपणे भाष्य केले आहे.

पोलीस दक्षता लाईव्ह या ऑनलाईन माध्यमातून त्यांनी समाजातील विविध समस्या प्रभावीपणे लोकांसमोर मांडल्या. सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंना समान निकष लावून प्रश्न विचारण्याची त्यांची भूमिका विशेष ठरली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या भावना, तक्रारी आणि अडचणी प्रशासन व संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे.

त्यांच्या धाडसी व अभ्यासपूर्ण वृत्तांकनाची दखल घेत “ज्ञानवंत पत्रकार” पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. या सन्मानामुळे त्यांनी अल्पावधीतच पत्रकारिता क्षेत्रात स्वतंत्र आणि विश्वासार्ह ओळख निर्माण केल्याचे अधोरेखित झाले आहे. सामाजिक बांधिलकी जपत जबाबदार पत्रकारितेचा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विविध सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात असून, भविष्यातही ते निर्भीड पत्रकारितेची परंपरा कायम ठेवतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Protected Content

Play sound