चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चाळीसगाव शहर पोलिस स्थानकाच्या वतीने आज जातीय सलोखा स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. तत्पूर्वी या मोहिमेस नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राज्यात सध्या भोंगा व हनुमान चालीसा वरून राजकीय वातावरण तापले आहे. तर दुसरीकडे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आले आहे. यामुळे जातीय सलोखा धोक्यात आल्याचे विदारक चित्र सध्या दिसून येत आहे. मात्र हिच स्थिती जळगाव जिल्ह्यात उद्भवू नयेत म्हणून पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्या संकल्पनेतून ठिकठिकाणी जातीय सलोखा स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून चाळीसगाव शहरातील तहसील कार्यालयासमोर शनिवार रोजी अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर पोलिस स्थानकाच्या वतीने जातीय सलोखा स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. तत्पूर्वी सदर मोहिमेचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी केले. तर चाळीसगाव शहरात कायदा व सुव्यवस्था कोणीही बिघडवणार नाही. यांची दक्षता घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी यावेळी आपल्या प्रास्ताविकेत केले आहे. सदर मोहिम हे सकाळी १० वाजेपासून तर रात्री ८ वाजेपर्यंत राबविण्यात येणार आहे. दरम्यान सदर अभियानामध्ये विविध क्षेत्रातील दिग्गजांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवित आपली स्वाक्षरी केली. दुपारपर्यंत एकूण ८०० लोकांनी सह्या केल्या होत्या.
याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलिस निरीक्षक के. के. पाटील, योगाचार्य चंद्रात्रे बाबा, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार करंबळेकर, वनाधिकारी नगराळे, नायब तहसीलदार धनराळे व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.