चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यातील ओढरे येथील महिला सरपंचांना तिसरे अपत्य असल्याच्या कारणावरून केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यात येत असून यात पहिल्याच दिवशी त्यांनी या चौकशीला अनुपस्थित राहिल्याने चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील ओढरे येथील महिला सरपंच पुष्पा जगन पवार यांनी गेल्या आठ महिन्यांपूर्वी ओढरे ग्रामपंचायतीची निवडणूक दोन अपत्य दाखवून लढवली व त्या सरपंच पदावर विराजमान झाल्या. दरम्यान सरपंच पुष्पा जगन पवार यांना १२ सप्टेंबर २००१ नंतर तीसरे अपत्य असल्याची माहिती समोर आली आहे. ओढरे येथील ग्रामस्थ बळीराम दगडू पवार यांनी १ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केलेल्या लिखीत स्वरुपाच्या तक्रारीवरून हि गंभीर बाब उघडकीला आली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांना पत्राद्वारे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ज- ३) प्रमाणे तातडीने कारवाई करण्याचे निर्देशन दिलेले आहे. याबाबतची चौकशी करण्याकामी चाळीसगाव गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी ए. एम. राठोड यांची नेमणूक केली आहे. मात्र महिला सरपंच पुष्पा जगन पवार ह्या चौकशीच्या पहिल्याच दिवशी हजर न राहिल्यामुळे ते अधिकच अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहेत. दरम्यान चौकशीतून काय निष्पन्न होणार याकडे संबंध तालुक्याचे लक्ष लागले आहे.