चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत आपला दारूण पराभव होईल हे स्पष्ट दिसत असल्यानेच परिवर्तन पॅनलतर्फे बिनबुडाचे, हास्यास्पद व अनाठायी आरोप करण्यात येत असल्याचा पलटवार नारायणभाऊ अग्रवाल यांच्या वतीने योगेश अग्रवाल यांनी केला आहे.
राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या उद्या होत असलेल्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. या अनुषंगाने परिवर्तन पॅनलच्या वतीने डॉ. विनोद कोतकर यांनी प्रगती पॅनलवर गंभीर आरोप केले आहेत. याला प्रगती पॅनलचे सर्वेसर्वा नारायणभाऊ अग्रवाल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून योगेश अग्रवाल यांनी हे निवेदन जारी केले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत पराभव स्पष्ट दिसू लागल्याने परिवर्तन पॅनलचे प्रमुख व विद्यमान सचिव डॉ. विनोद कोतकर हे बिनबुडाचे व हास्यास्पद आरोप करीत आहेत. मी संस्थेसाठी आयुष्य खर्ची घातले आहे, याचा कधीही गाजावाजा केला नाही.
पॅनल प्रमुख अग्रवाल हे घरातून संस्था चालवितात हा आरोप केला आहे.
याबाबत स्पष्टपणे सांगू इच्छितो की, विद्यमान सचिव यांनी मॅनेजिंग बोर्ड, ट्रस्टी बोर्ड तसेच विविध विभागांच्या सभा या माझ्या (नारायणदास अग्रवाल) घरी आयोजित केल्या होत्या का ? सचिव तसेच विद्यमान संचालक, अध्यक्ष हे सभांना माझ्या घरी उपस्थित राहत होते काय ? याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे.
विविध कॅटेगिरीमध्ये सभासद केल्याचा जो आरोप आहे.
त्याबाबत नमूद करतो की, विविध कॅटेगिरीज् या १९९२ च्या घटनेत व तत्वपूर्वीच्या असून त्या कॅटेगिरीत तत्कालीन चेअरमन स्व. डॉ. काकासाहेब वा. ग. पूर्णपात्रे यांच्या कार्यकाळात तयार करण्यात आल्या आहेत. योग्य त्या देणग्या देवून कॅटेगिरीमध्ये सभासदत्व देणे व संस्थेला आर्थिक हातभार लावणे हा गुन्हा आहे का ? त्या कॅटेगिरीज्मध्ये इतर कुणालाही सभासदत्व मिळू शकले असते. याचाच अर्थ ज्या महान देणगीदारांनी देणग्या देवून त्या कॅटेगिरीज्मध्ये सभासदत्व मिळविले हा सरळ-सरळ त्यांचा अवमान आहे. याबाबत सन्माननीय देणगीदारांची परिवर्तन पॅनलने माफी मागितली पाहिजे. अन्यथा मतदार त्यांना माफ करणार नाही.
विश्वस्त मंडळात नवीन सदस्यांची झालेली निवड
घटनेने दिलेल्या अधिकारानुसार मॅनेजिंग बोर्डाने एकमताने निवड केलेली असून विद्यमान सचिव व परिवर्तन पॅनलमध्ये असणारे संचालक यांनी त्यास कोणताही विरोध नोंदविलेला नाही.
सभेचा अजेंडा
परिवर्तनने जाहिर केलेल्या प्रेस नोटमध्ये नमूद केल्यानुसार सभासदांना वैयक्तिकरीत्या सभेचा अजेंडा मिळावा व सभासद यादी त्यांच्या पत्त्यासह अद्ययावत करण्याचे काम दर्शविले आहे. मात्र हे कामकाज सचिव यांनीच करावयाचे असून ५ वर्षात ते त्यांना सूचले नाही का ? की, फक्त धुळफेक करायची म्हणून हे जाहिर करण्यात आले आहे.
संस्थेच्या स्वत:च्या स्कूलबस
सुरु करण्याबाबत प्रेस नोटमध्ये म्हटले आहे. याबाबतीत परिवर्तन पॅनलमधून निवडणूकी लढविणारे शाळांचे विद्यमान चेअरमन डॉ. सुनिल राजपूत व राजेंद्र रामदास चौधरी यांना याआधी अशी कल्पना का सूचली नाही ?
शिक्षकांचा योग्य तो गौरव
शिक्षकांचा तात्काळ वेळोवेळी योग्य तो गौरव करणे ही संस्थेची उज्ज्वल परंपरा आहे. त्यासाठी शिक्षक दिनाचे औचित्य शोधण्याची गरज नाही. आमच्या मनात शिक्षक नेहमीच संस्थेचा मानबिंदू राहिला आहे, आणि राहणार आहे.
आम्ही हे करणार (?)
यात जे म्हटले आहे, असे जाहिर करण्याची आवश्यकता नाही. हे तर संस्थेचे कामकाजच आहे.
एकंदरीत काय तर बिनबुडाचे व दिशाभुल करणारे आरोप करणे व मतदारांची दिशाभूल करणे हे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे उदाहरण आहे.
संस्थेच्या निवडणूकीत मतदारांना आजपावेतो कोणतेही आर्थिक प्रलोभने दिल्याचे ऐकीवात नाही. प्रथमच आपण हा मुद्दा उपस्थित करुन आपल्या मनातील मतदारांविषयी असणारी घृणा व्यक्त करुन त्यांचा अवमान सुध्दा केला आहे.
आमचे खुले आव्हान !
बोलायचेच असेल तर संस्था विकासाच्या दृष्टीने आपण ५ वर्षात काय केले ? कोणते प्रस्ताव आणले ? कोणते अनुदान मिळविले ? हे जाहिररीत्या सांगावे, असे आमचे त्यांना खुले आव्हान आहे असे या निवेदनात म्हटले आहे.