चाळीसगाव प्रतिनिधी । डांबरच्या भरलेल्या टँकर मधून नऊ टन डांबर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना तालुक्यातील तरवाडे येथील परिसरात घडली होती. मात्र पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सविस्तर वृत्त असे की, विजय चंद्रमा आशण्णा (वय- ३५ रा. काजीवाडा औरंगाबाद ) यांच्या मालकीच्या भरलेल्या टँकरमधील ९ टन डांबर दि. ६ ते ७ एप्रिल दरम्यान चोरून नेल्याची घटना तालुक्यातील तरवाडे येथे घडली होती. गट क्र. २६३ येथून अज्ञात इसमाने ती चोरून नेली होती. एकूण साडे चार लाख रुपये किंमतीचे डांबर चोरीला गेल्याने विजय चंद्रमा आशण्णा यांच्यावर डोंगरच कोसळला होता.
दरम्यान, याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होताच सहायक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांच्या टिमने अवघ्या चोवीस तासांत शोध घेऊन देवाजी सुभाष गायकवाड (वय-३२ रा. भोरस गायरान ता. चाळीसगाव), विनोद रामदास सोनवणे (वय-२१ रा. दहिवद ता. मालेगाव) आणि एकनाथ हिरामण सोनवणे (वय- २३ रा. मल्हारवाडी अंजन वडग ता. मालेगाव) या चोरट्यांना चाळीसगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
यातील देवाजी सुभाष गायकवाड व विनोद रामदास सोनवणे यांना दि. ९ एप्रिल रोजी रात्री ९:५८ वाजता तर एकनाथ हिरामण सोनवणे याला आज चाळीसगाव येथूनच ताब्यात घेतले आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणाचे कौतुक होत आहे. या आरोपींवर कारवाई सुरू असून पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत.