चाळीसगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील एस.टी.महामंडळाच्या दुष्काळ सरळ सेवा भरती २०१९ मधील उमेदवारांचे थकीत असलेले सेवा पूर्व प्रशिक्षण सुरू करण्याची मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे. यावर कार्यवाही न केल्यास त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
या संदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जळगाव विभागासाठी दुष्काळ सरळ सेवा भरती २०१९ मध्ये अंतिम निवड होऊन पुरुष व महिला उमेदवाराचे सेवापूर्व प्रशिक्षण सुरू करण्यात आले होते. तथापि, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच १९ मार्च २०२० रोजी जळगाव विभाग नियंत्रकांच्या आदेशाने निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण तात्पुरते स्थगित करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच उर्वरीत प्रशिक्षण पूर्ण करून तुम्हाला सेवेमध्ये घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र, नंतर कोरोना प्रादुर्भाव वाढून राज्यात लॉकडाउन झाला.
आता राज्य अनलॉक होवून बससेवा पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांचे स्थगित असलेले सेवापूर्व प्रशिक्षण सुरू करावे. आणि त्यांना सेवेत रुजू करून घ्यावे. तसेच महिला उमेदवारांना चालकांचे राहिलेले प्रशिक्षण न देता वाहकाचे प्रशिक्षण देऊन वाहक म्हणून रुजू करून द्यावे. दहा दिवसांत प्रशिक्षण सुरू न झाल्यास जळगाव विभागीय कार्यालयासमोर उपोषणाला बसू असा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी या पत्राद्वारे दिला आहे.