चाळीसगाव प्रतिनिधी । उपनगराध्यक्षांवरील अविश्वास प्रस्ताव उलटवून लावण्यासाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीने विषय समित्यांच्या निवडीतही बाजी मारल्याचे दिसून आले आहे.
याबाबत वृत्त असे की, विषय समितीची सदस्य संख्या व नावे निश्चित करण्यासाठी मंगळवारी पालिकेची विशेष ऑनलाइन सभा झाली. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार अमोल मोरे, तर व्यासपीठावर नगराध्यक्षा आशालता चव्हाण, मुख्याधिकारी शंकर गोरे उपस्थित होते.
याप्रसंगी समितीत ११ सदस्य असावे, असा प्रस्ताव भाजपने सभेपुढे ठेवला. तर समितीत १० सदस्य असावेत, असा प्रस्ताव शविआकडून आला. दुपारपर्यंत त्यावर खल सुरू होता. अखेरीस आघाडीच्या प्रस्तावाच्या बाजूने शिवसेना व अपक्ष असे एकुन १८ सदस्य असल्याने हा प्रस्ताव पीठासीन अधिकार्यांनी मान्य केला.
याप्रसंगी दहा सदस्यीय समितीत शविआ ५, भाजप ४, तर सेनेचा १ सदस्य असेल. मात्र, शिवसेनेच्या दोन्ही सदस्यांमध्ये एकमत न झाल्याने एका जागेसाठी दोन नावे आली. दुपारपर्यंत यावर सहमतीचा प्रयत्न झाला. मात्र, मार्ग न निघाल्याने दोन्ही नावांचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठवण्याचा निर्णय पीठासीन अधिकारी अमोल मोरे यांनी जाहीर केला.