चाळीसगाव प्रतिनिधी । विहरीत पोहण्यासाठी गेलेल्याच्या खांद्यावर हात ठेवल्याच्या किरकोळ कारणावरून येथे मारहाणीसह चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, सुशांत संजय मांडोळे (वय- २५ रा. खडकी बु. ता. चाळीसगाव) येथे आपल्या आई-वडिल व भाऊ प्रशांत मांडोळे यांच्यासह वास्तव्यास आहेत. दि.२९ मार्च रोजी दुपारी ३:१० वाजता चुलत काका राहूल आण्णा मांडोळे यांनी सुशांत मांडोळे यांच्या घरी जाऊन त्यांचा भाऊ दुर्गेश याच्यासह प्रशांत मांडोळे तसेच सोनू संजय मराठे व ऋषीकेश शिवाजी डोके हे एम.आय.डी.सी परिसरातील भारत वायररोप कंपनी समोरील विहीरीत पोहोचण्यासाठी गेले असता. त्यांना चाळीसगाव येथील काही मुलांकडून मारहाण होत असल्याची माहिती दिली. यामुळे त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
यानंतर राहूल मांडोळे व सुशांत मांडोळे हे घटनास्थळी पोहोचल्यावर दुर्गेश व प्रशांतला मारहाण झाल्याचे त्यांना दिसून आले. ते सुशांत मांडोळे हे विचारपूस करत असताना दुर्गेश दिवटे व त्याचे मित्र भोला अजबे, हर्षल राजपूत, अजिंक्य राजपूत, राकेश गोसावी, भैय्या अजबे व बंटी नागरे (सर्व रा. चाळीसगाव) यांनी त्यांना मारहाण केली. यात दुर्गेशच्या मित्रांपैकी हर्षल राजपूत याने अजिंक्य राजपूत याच्या मदतीने चाकूने वार केले. त्याचवेळी या सर्वांनी मिळून सुशांत मांडोळे यांना मारहाण केली.
यात सुशांतला दुखापत झाल्याने त्याला शहरातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शुध्दीवर आल्याने त्यांनी दि.३० मार्च रोजी सायंकाळी ५:३७ वाजताच्या दरम्यान शहर पोलिस ठाण्यात सुशांत माडोंळे यांनी जबाब नोंदवून भादंवि कलम ३०७, ३२४,३२३, १४३, १४७, १४८, १४९,५०४ व महा.पो.अधिनियम ३७(१-ल) व १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि महावीर जाधव हे करीत आहेत.