चाळीसगाव प्रतिनिधी । व्यवस्थापन कोर्सेसचे प्रशिक्षण देणार्या संस्थेची फ्रांचायजी देण्याच्या नावाखाली दाम्पत्याची सात लाख रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणी एकाविरूध्द चाळीसगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, नाशिक येथील अविनाश वसंत शिसोदे (वय ५२, रा.कॉलेज रोड, नाशिक) याची ई अँड थ्री इन्व्होटीव्ह नावाने व्यवस्थापन क्लासेस ही कंपनी आहे. चाळीसगाव येथील शहरातील भगवती विहार भागातील दाम्पत्याने या क्लासेसमध्ये २०१४ मध्ये प्रशिक्षण घेतले. येथेच त्यांचा अविनाश शिसोेदे याच्याशी परिचर झाला. याप्रसंगी कंपनीची औरंगाबाद येथील फ्रेन्चाइझी देण्याचे आमिष या दाम्पत्याला दाखवण्यात आले. त्यासाठी कंपनीत ७ लाख रूपये गुंतवावे लागतील, असे शिसोदेने सांगितले. त्यानुसार या दाम्पत्याने २०१६ मध्ये ७ लाखांची गुंतवणूक केली. त्यानंतर मात्र शिसोदेने आश्वासन पाळले नाही.
शिसोदे याने संबंधीत दाम्पत्याचे दिलेले पैसे देखील परत केले नाही. दरम्यान, २ नोव्हेंबर २०२० रोजी अविनाश शिसोदे हा चाळीसगाव येथे लग्न समारंभासाठी आला होता. त्यावेळी फसवणूक झालेल्या दाम्पत्याने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. यावेळी शिसोदेने त्यांना शिवीगाळ, तसेच महिलेला धक्काबुक्की व विनयभंग केला. या नंतर देखील शिसोदेने दाम्पत्यास धमकी दिली. यामुळे या दाम्पत्याने चाळीसगाव पोलीस स्थानकात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.