चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पोहरे येथील केशव राघो महाजन यांच्या घराला काही दिवसांपूर्वी आग लागली होती. या कुटुंबाला आमदार मंगेश चव्हाण यांनी मदत केली आहे.
काही दिवसांपूर्वी तालुक्यातील पोहरे येथील केशव राघो महाजन यांच्या घराला गॅस लिकेजमुळे लागलेल्या आगीत घरातील जवळपास ७ लाख ७० हजारांची रोख रक्कम व दागिने जळून खाक झाले होते. आमदार मंगेश चव्हाण यांना याबाबत कळताच त्यांनी माहिती घेत लवकरच या कुटुंबाची भेट घेण्याचे आश्वासन दिले होते.
या अनुषंगाने आमदार मंगेश चव्हाण यांनी पोहरे येथे केशव महाजन यांची भेट घेत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. ग्रामस्थांनी मांडलेली व्यथा पाहून आमदार मंगेश चव्हाण यांनी केशव महाजन यांना ५० हजार रुपयांची मदत दिली. तसेच आगीत अर्धवट जळालेल्या नोटा मुंबई येथील रिझर्व्ह बँकेतून बदलवून आणेल, अशी ग्वाही सुध्दा दिली.
याप्रसंगी सरपंच काकासाहेब माळी, पंजाबराव अहिरराव, प्रमोद पाटील, मोहन जाने, नाना साबळे, महारु महाजन, गोकुळ माळी, प्रकाश बागुल, सुरेश महाजन, राजू माळी, रावसाहेब माळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.