चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिलखोड येथे देशी दारूच्या दुकानाच्या विरोधात एकमुखी निर्णय घेण्यात आला असून या माध्यमातून गावकर्यांच्या आंदोलनास यश आले आहे.
पिलखोड गावातील देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे या मागणीसाठी काल मतदान घेण्यात आले. यात गावातील १९५८ महिलांपैकी ११२० महिलांनी मतदानात भाग घेतला. यातील ९९१ महिलांनी देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे असे मत नोंदविले. तर ४४ महिलांनी दुकान सुरू रहावे असे मत दिले. या प्रक्रियेत ८५ मते बाद ठरली. यामुळे पिलखोड येथील देशी दारूचे दुकान आता बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काही महिन्यांपूर्वी एका युवकाने पिलखोड येथील देशी दारूच्या दुकानातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याने खळबळ उडाली होती. तेथूनच देशीच्या विरोधात जनआक्रोश भडकला होता. यानंतर प्रशासनाना विशेष ग्रामसभेत गावातील महिलांचे मतदान घेतले असता यात बहुमताने दुकान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून पिलखोडकर महिलांनी एकतेची वज्रमूठ दाखवून दिली आहे.