
चाळीसगाव (प्रतिनिधी) मंगेश चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने यावर्षी ‘चाळीसगावचा एकदंत’ या भव्य गणरायाच्या मूर्तीची सोमवारी वाजत-गाजत मिरवणूककाढण्यात आली. यावेळी वाजत गाजत मोठ्या जल्लोषात बाप्पाच्या आगमनाचे स्वागत करण्यात आले.
गणराय बुद्धीची देवता. समस्त मराठी माणसे आतुरतेने ज्यांची वाट पाहतात, असा हा सामाजिक सण. गणरायाचे आगमन म्हणजे विचारांच्या देवाणघेवाणीची पर्वणी. आस्था व श्रद्धेचे प्रतीक म्हणजे गणराय. स्व.रामभाऊ जीभाऊंच्या पुतळ्याला वंदन करून मिरवणुकीची सुरवात झाली. कृषी उत्पन्न बाजार समिती पासून सुरु झालेली ही मिरवणूक हॉटेल दयानंद, सिग्नल पॉइंट, सिताराम पहिलवाण मळा अशी भव्य काढण्यात आली. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला शिवतांडव या जळगावच्या ढोल पथकाचे बहारदार ढोल गर्जत होते. त्यानंतर बँड च्या तालावर गणरायाच्या गाण्यांवर तरुणाई थिरकत होती. मिरवणूक मार्गावर रस्त्याच्या दोन्ही कडेला चाळीसगावकरांनी ही मिरवणूक बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
मंगेश चव्हाण यांनी या मिरवणुकीच्या निमित्ताने चाळीसगाव तालुक्याला दुष्काळ मुक्तीकडे घेऊन जाण्याचा संकल्प गणरायांच्या चरणी वाहिला. तसेच चाळीसगावची शांतता व सामाजिक बंधुता कायम राहण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी केले. दुपारी तीन वाजता सुरू झालेली मिरवणूक रात्री साडेअकरा वाजता सिताराम पहिलवान मळा येथे संपन्न झाली. सिताराम पहिलवान मळा येथे चाळीसगाव वासीयांना उद्यापासून सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मंगेश चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने देण्यात येणार आहे. विविध प्रकारचे प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन मंगेश चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आलेले आहे.