चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या १६ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी एकूण ८ हजार ४१४ मतदानांपैकी ६४ टक्के मतदान झाले असून उद्याच्या निकालाकडे संबंध तालुक्याचे लक्ष लागले आहे.
तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या चाळीसगाव एज्युकेशन पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवार रोजी शहरातील आ. बं. विद्यालयात मतदानाची प्रक्रिया पार पडली. सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हि प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी संस्थेचे एकूण ८ हजार ४१४ मतदारांपैकी फक्त ५४५३ मतदान झाले असून एकुण ६४.०७ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देशमुख यांनी दिली आहे.
दरम्यान, सोमवारी चाळीसगाव महाविद्यालयात मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ऍड. पंकज देशमुख, ऍड. रणजित पाटील व ऍड. शिवाजी बाविस्कर यांनी दिली. तत्पूर्वी संपूर्ण मतदान प्रक्रिया सीसीटीव्हीच्या निगराणीखाली घेण्यात आली. याप्रसंगी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मतमोजणी प्रक्रियाही पोलिस बंदोबस्तात होणार असून सोमवारी सकाळी ८ वाजता या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे. यासाठी २१ टेबल लावण्यात येणार आहेत. प्रत्येक टेबलावर ४०० मतपत्रिकांची मतमोजणी ३ कर्मचारी पूर्ण करतील. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यासह पेट्रन, सिनीअर पेट्रन, फेलोज, सर्वसाधारण व देणगीदार गटातील मतपत्रिकांची सर्वप्रथम छाननी होईल अशी मागणी देखील निवडणूक अधिकार्यांनी दिली आहे.
यंदाची निवडणूक ही अतिशय चुरशीची झाली असून यात नेमके कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.