चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यातील मुंदखेडे बुद्रुक येथील शिवारातल्या बांधाच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली असून या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या संदर्भात मुंदखेडे बुद्रुक येथील सुधीर शिवाजी पाटील (वय५७) यांनी फिर्याद दिली आहे. यानुसार त्यांचा मुलगा महेश हा काल दुपारी दीड वाजेच्या सुमारास गुरांसाठी उसाचे टिपरे वेचत असतांना बांधावरील झाड तोडल्याच्या वादातून जगदीश उर्फ नाना संजय पाटील, बंटी संजय पाटील, ऋषीकेश गोकुळ पाटील, एकनाथ बालचंद्र पाटील आणि मुकेश आत्माराम पाटील यांनी कुर्हाडीचा दांडा आणि लोखंडी रॉडने त्याला मारहाण केली. यात महेश हा जखमी झाला आहे. तसेच त्याला जीवे ठार मारण्याची धमकी सुध्दा देण्यात आली.
या अनुषंगाने चाळीसगाव पोलीस स्थानकात जगदीश उर्फ नाना संजय पाटील, बंटी संजय पाटील, ऋषीकेश गोकुळ पाटील, एकनाथ बालचंद्र पाटील आणि मुकेश आत्माराम पाटील यांच्या विरोधात भाग-५ गुरनं ७०/२०२२ भादंवि कलम ३०७, ३२४, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ४४७ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा अधिनियम कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास उपनिरिक्षक लोकेश पवार हे करीत आहेत.
तर दुसरी फिर्याद जगदीश संजय पाटील यांनी दिली आहे. यानुसार काल दुपारी महेश सुधीर पाटील याने बांधावरील झाड तोडून ते ट्रॅक्टरमध्ये टाकत असतांना आपण त्याला हटकले. यावर सुधीर शिवाजी पाटील आणि महेश सुधीर पाटील यांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. तसेच त्याला दांड्याने देखील मारण्यात आले. यामुळे तो जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे.
या फिर्यादीनुसार सुधीर शिवाजी पाटील आणि महेश सुधीर पाटील यांच्या विरोधात भाग-५ गुरनं ७३/२०२२ भादंवि कलम ३०७, ३२३, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.