जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अकोला येथील हॉटेल सेंटर प्लाझा येथून वाढदिवसाचा कार्यक्रम आटपून दुचाकीने घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील अडीच लाख रूपये किंमतीची ३५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन लांबविणाऱ्या दोन संशयित आरोपींना शनीपेठ पोलीसांनी कुसुंबा आणि कासमवाडीतून बुधवारी १९ ऑक्टोबर रोजी दुपारी अटक केली आहे.
मिळालेली माहिती अशी की, अकोला शहरातील हॉटेल सेंटर प्लाझा येथे वाढदिवसाच्या कार्यक्रम आटोपून महिला दुचाकीने घरी परतत होत्या. त्यावेळी अज्ञात तीन जणांनी दुचाकीवर येवून महिलेच्या गळ्यातील अडीच लाख रूपये किंमतीची ३५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हिसकावून पसार झाल्याची घटना घडली होती. या संदर्भात अकोला जिल्हा सिव्हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आकोला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासणी केली असता यातील संशयित आरोपी हे जळगाव शहरातील असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार तेथील पोलिसांनी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी पोलीस पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल परिस जाधव, पोलीस नाईक विजय निकम, अनिल कांबळे, राहुल घेटे, राहुल पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी आकाश ज्ञानेश्वर सूर्यवंशी (वय-२६) रा. प्रजापत नगर, ममुराबाद रोड, जळगाव याला कुसुंबा येथून अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याने इतर दोन साथीदारांची नावे सांगितले.
यात दीपक रमेश शिरसाठ (वय-२६) रा. वरखेडी ता. पाचोरा आणि लोकेश महाजन रा. खेडी ता. जळगाव अशी दोघांची नावे समोर आली. या तिघांनी मिळून अकोला जिल्ह्यातील एकूण ९ चैन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली आहे. तसेच या गुन्ह्यातील दुसरा साथीदार दीपक रमेश शिरसाठ याला जळगावातील कासरवाडी येथून अटक केली. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी (एमएच १४ केजी ७१९९) जप्त करण्यात आली.तर तिसरा आरोपी लोकेश महाजन हा फरार झाला आहे. अटकेतील दोन्ही संशयित आरोपींना अकोला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.