Home Cities जळगाव जिल्हा परिषद समोर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण !

जिल्हा परिषद समोर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण !

0
151


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांवर प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ ‘जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ’ या संघटनेने जोरदार आंदोलन सुरू केले आहे. संघटनेचे समन्वयक एच. डी. भारुड यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे.

कार्यालयीन अनागोंदीमुळे संताप
शिक्षक कर्मचाऱ्यांचे प्रश्न वर्षानुवर्षे रखडले असतानाही प्रशासन गंभीर दखल घेत नसल्याचा आरोप व्यासपीठाने केला आहे. विशेषतः प्रलंबित प्रकरणे मंजूर न करणे, वेतन पथकाकडून अपूर्ण माहिती देणे आणि टप्पा अनुदान आदेश वाटपात होणारा विलंब यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संताप आहे. या कार्यालयातील अधिकारी वारंवार गैरहजर राहत असल्याने कार्यालयाचे कामकाज इतरत्र ठिकाणाहून चालते. त्यामुळे आपले काम करून घेण्यासाठी आलेल्या शिक्षकांना तासन्तास जिल्हा परिषदेच्या आवारात ताटकळत बसावे लागते, तरीही कामे वेळेवर होत नाहीत.

शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन
शिक्षण विभागाच्या या भोंगळ आणि टाळाटाळीच्या कारभाराला कंटाळून अखेर ‘जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठा’ने उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. जोपर्यंत प्रलंबित प्रकरणे मंजूर होत नाहीत आणि सर्व मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत, तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहील, असा ठाम पवित्रा संघटनेने घेतला आहे.

दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी तातडीने उपोषणस्थळी भेट दिली. उपोषणकर्त्यांच्या समस्या ऐकून घेत, येत्या एक आठवड्याच्या आत त्यांच्या सर्व तक्रारी आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.


Protected Content

Play sound