Home आरोग्य सीईओंचा लम्पीग्रस्त गावांचा दौरा; पशुपालकांशी संवाद !

सीईओंचा लम्पीग्रस्त गावांचा दौरा; पशुपालकांशी संवाद !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील २३ वेगवेगळ्या ठिकाणी जनावरांमध्ये लम्पी स्किन (कातडी सदृश) आजाराची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे जिल्हा प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आले असून, लम्पीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मिनल करनवाल यांनी केले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी आज, बुधवार, २३ जुलै रोजी पारोळा आणि एरंडोल तालुक्यातील खेड्यांचा दौरा करत लसीकरण मोहिमेची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी त्यांनी स्थानिक पशुपालकांशी संवाद साधून लम्पी आजाराबाबत आवश्यक मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड हे देखील उपस्थित होते.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १६६ जनावरे लम्पीने बाधित झाली आहेत, त्यापैकी ५० जनावरे पूर्णपणे बरी झाली आहेत. सद्यस्थितीत ६६ जनावरे बाधित असून, दुर्देवाने ६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने लसीकरणावर विशेष भर दिला असून, सतत निरीक्षण आणि नियंत्रण उपाययोजना सुरू केल्या आहेत.

मिनल करनवाल यांनी स्पष्ट केले की, लम्पी आजार हा संसर्गजन्य नाही आणि या आजाराची माणसांमध्ये कोणतीही लागण होत नाही. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. दूध उकळून प्यावे आणि कोणताही संभ्रम बाळगू नये, असे आवाहन त्यांनी केले. प्रशासनामार्फत जनजागृती, लसीकरण आणि उपचार मोहिमांना वेग दिला जात असून, पशुपालकांनी प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound