नवीदिल्ली, वृत्तसंस्था | केंद्रीय कर्मचाऱ्यांना हे वर्ष संपण्याआधीच नववर्षाचे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार लाखो कर्मचाऱ्याना हे नववर्षाचे मोठे गिफ्ट देऊ शकते. येत्या काही दिवसांमध्ये सरकार महागाई भत्त्यामध्ये (डीए) चार टक्क्यांची वाढ करेल, असा वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांचा असा अंदाज आहे. या चार टक्के वाढीला मंजुरी मिळाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार जवळपास ७५० रूपये ते १० हजार रूपये एवढा वाढू शकतो.
वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता हैराण आहे. जुलै २०१९ ते डिसेंबर २०१९ या काळात महागाईचा दर वाढत गेला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार डीएमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते. मात्र, यात किती वाढ करावी, हे महागाई किती वाढली यावर अवलंबून असते. गेल्या सहा महिन्यांतील महागाईचा वाढता दर बघता सरकार न्यू ईयर गिफ्ट देण्याची तयारी करू शकते, असे काही कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे.
किमान वेतन आणि फिटमेंटमध्ये वाढ करा, अशी केंद्रीय कर्मचाऱ्यांची गेल्या काही दिवसांपासूनची मागणी आहे. किमान वेतन १८ हजार रुपयांवरून २६ हजार करावे, असे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे. याशिवाय २.५७ टक्के असलेले फिटमेंट आता ३.६८ टक्के करावे, अशीही संघटनांची अपेक्षा आहे. मात्र, देशाची सध्याची आर्थिक स्थिती पाहता, सरकार डीएमध्ये वाढ करेल का आणि त्यामुळे वाढणारा आर्थिक बोजा सहन करेल का ? हे येणारा काळच ठरवेल.