Home Cities भुसावळ वरणगावात नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी सुरू झाल्याने आनंदोत्सव !

वरणगावात नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी सुरू झाल्याने आनंदोत्सव !


वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरासाठी नव्याने सुरू झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी नुकतेच उपलब्ध झाल्याच्या आनंदात, श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी शहरात भव्य जलदिंडी काढण्यात आली. भर पावसातही हजारो महिलांनी उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेतला, घराबाहेर येऊन त्यांनी नवीन योजनेतून आलेल्या पाण्याचा एक लोटा मोठ्या कळसात अर्पण करत आनंद व्यक्त केला.

या जलदिंडीची सुरुवात वरणगाव शहरातील सिद्धेश्वर महादेव मंदिरापासून करण्यात आली. नवीन योजनेचे आलेले पाणी एका मोठ्या हंड्यांमध्ये जमा करून, मिरवणुकीद्वारे तीर्थक्षेत्र नागेश्वर येथे जलाभिषेक करण्यात आला. संपूर्ण वरणगाव शहरात या जलदिंडीचे बुंदी वाटून, फटाके फोडून आणि वाजंत्रीच्या जल्लोषात भर पावसात स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या, गुढ्या उभारल्या होत्या, तर काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.

जवळपास १७ दिवसांनी मिळणारे पिण्याचे पाणी आता ५ दिवसाआड मिळू लागल्याने शहरातील पाणीटंचाई संपुष्टात आल्याचा आनंद महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यामुळेच भर पावसातही घराबाहेर पडून त्यांनी या जलदिंडीत सहभाग घेतला, फुले उधळून आणि टाळ्या वाजवून स्वागत केले. दिंडीत भगवान शंकर आणि पार्वतीचा रोल देखावा विशेष आकर्षण ठरला. मिरवणुकीत ११ किलो बुंदी वाटण्यात आली.

या जलदिंडीचा शुभारंभ सहायक पोलीस निरीक्षक अमित बागुल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, सुनील माळी, रमेश पालवे, नाना चौधरी, मिलिंद भैसे, शामराव धनगर, अनिल वंजारी, सुभाषदादा महाजन, संजय माळी, संतोष पाटील, ॲड. ए.जी. जंजाळे, योगेश माळी, मयूर शेळके, बळीरामदादा सोनवणे, नामदेवदादा सोनवणे, तुकाराम कोळी, हितेश चौधरी, अरुण बावणे, रामभाऊ माळी, सुनील देशमुख, मुन्ना माळी, नंदू महाराज जोशी, आकाश निमकर, संजय बेदरकर, गोलू राणे, राहुल जंजाळे, प्रकाश गव्हाळे, बाळू सैतवाल यांच्यासह रुक्मिणी काळे, रुपाली काळे, लीलाबाई दत्तू मराठे, आशा दत्तू मराठे, रंजना जोगी, ज्योती सपकाळे, सरलाताई, निर्मला शेळके, चंद्रकला वाळूकर, प्रीती शेळके, अश्विनी जोशी, शुभांगी अकोले, शोभा पुणासे, नलिनी पालवे अशा हजारो महिला भर पावसात उपस्थित होत्या.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी नागेश्वर मंदिरात जलाभिषेक करताना, “जोपर्यंत वरणगाव करांना २४ तास पाणी मिळणार नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही,” असा संकल्प सर्व कार्यकर्त्यांनी घेतला.


Protected Content

Play sound