जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वप्न साकार फाउंडेशन आयोजित आणि अग्निशिखा महिला ग्रुपच्या वतीने ‘स्त्री शक्ती सन्मान सोहळा’ सरदार वल्लभभाई पटेल हॉल येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे व उपमहापौर मनोज चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे डॉ. नितीन विसपुते आदी मान्यवर उपस्थित होते. कॅन्सर तज्ञ डॉ. निलेश चांडक यांनी वाढत्या कॅन्सर आजाराबाबत उपचार व प्रतिबंधात्मक उपायांवर मार्गदर्शन केले. तर डॉ. नितीन विसपुते यांनी व्यसनमुक्तीवर अनोख्या कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करत उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमात जिल्हाभरातून आलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत वातावरण रंगतदार केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले. व्यासपीठावर डॉ. सीमा पाटील, डॉ. पूजा सोमानी, डॉ. श्रद्धा राणे, नायब तहसीलदार प्राजक्ता केदार, डॉ. उमा चांदूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
‘खानदेश रत्न’ पुरस्काराने मान्यवरांचा गौरव
अग्निशिखा महिला ग्रुपतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना ‘खानदेश रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात डॉ. निलेश चांडक, डॉ. सीमा पाटील, डॉ. पूजा सोमानी, डॉ. प्राची महाजन, डॉ. नितीन विसपुते, डॉ. अविनाश खेलवाडे, प्रा. वासुदेव पाटील, डॉ. श्रद्धा राणे, डॉ. शीतल पाटील, जागृती येवले, तृप्ती कांकरिया, युगंधरा सोळुंके, डॉ. अवधूत चौधरी, डॉ. रुकसाना खान यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्षा भारती काळे, वंदना पाटील, स्नेहा सोनवणे, हर्षला रायसिंग, पुष्पा तळेले,लक्ष्मी कुमावत,सुप्रिया शिंपी,प्रिया वाघ,संजना पावरा,जागृती येवले यांच्यासह अग्निशिखा महिला ग्रुपच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.



