विद्यापीठात शिक्षणशास्त्र विभागाव्दारे ‘मराठी राजभाषा दिवस’ साजरा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागाद्वारे ‘मराठी राजभाषा दिवस’ तांत्रिक अडचणीमुळे शनिवार ५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला.

या निमित्त  शिक्षणशास्त्र विभागात ऑनलाइन स्वरूपात व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सुरवातीला शिक्षणशास्त्र विभागातील सेट पात्रता परीक्षेत यश मिळवलेल्या पुनम म्हासाने, मनीषा पारधी, राजेंद्र पाटील आणि रसुल तडवी या माजी विद्यार्थ्यांचा पुस्तक व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच शिक्षणशास्त्र विभागातील प्रा. रणजित पारधे यांना विद्यापीठाकडून शिक्षणशास्त्र विषयातून पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचासुद्धा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात प्रा.मोरेश्वर सोनार यांनी ‘दृकश्राव्य माध्यम यावरील संवाद कौशल्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. भाषा आणि संवाद हे अभिव्यक्तीचे प्रमुख माध्यम असले तरी दृकश्राव्य माध्यम यावरील संवाद कौशल्य ही एक कला आणि तांत्रिक बाब आहे आणि ती प्रयत्न व सरावाने आत्मसात करता येते असे त्यांनी मत मांडले. सोबतच AM आणि FM या रेडीओ प्रकारातील फरक, संवादाचे प्रकार, वाचिक व कायिक अभिनय, संवादातील स्वरांची तीव्रता, आरोह-अवरोह, बालाघात व वागेन्द्रीयाची रचन व कार्य व दृकश्राव्य माध्यमावरील संवादातील यांची भूमिका या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्राची सुरुवात काव्य वाचनाने करण्यात आली यात मोनाली पाटील, वैशाली कवडे, स्वप्नील पाटील, रुपाली पाटील, सविता अहिरराव, स्नेहा सोनार, अभिलाषा रोकडे, कांचन मिश्रा, प्रिती लिंडायत व डॉ. रणजीत पारधे यांनी काव्यवाचन केले.

यानंतर प्रा. विनोद भालेराव यांनी ‘कथा आणि काव्य निर्मितीच्या प्रेरणा’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. साहित्याच्या मध्यमातून मानवी संवेदनांचे प्रतिबिंब मांडले जाते. कथानिर्मितीच्या संदर्भात कथाबीज सापडणे तर कवितेच्या संदर्भात भावनांचे प्रकटीकरणासाठी योग्य शब्द निवड व मांडणी गरजेचे आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. भावनांचे प्रकटीकरण, यश, कीर्ती, अर्थ प्राप्ती, स्तुती किंवा प्रसिद्धी, अशुभ निवारण या साहित्य निर्मितीच्या प्रमुख प्रेरणाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनिषा इंदाणी यांनी भूषविले. प्रास्ताविक प्रा. समाधान कुंभार यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ. रणजीत पारधे यांनी करून दिला. सूत्रसंचालन शुभांगी वैराळकर व रंजना शेंडे यांनी तर आभार प्रदर्शन रूपाली पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राध्यापक डॉ. संतोष खिराडे व संशोधक विद्यार्थी जयश्री पाटील तसेच सर्व विद्यार्थांचे सहकार्य लाभले.

Protected Content