
जळगाव (प्रतिनिधी) बोहरा समाजातर्फे आज (मंगळवार) रजमान ईद साजरी करण्यात आली. सामूहिक नमाज पठणानंतर ईदच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. मुस्लिम बांधवांच्या रमजान पर्वाच्या एक दिवस अगोदर बोहरा समाजाच्या रमजानला प्रारंभ झाला. त्यानुसार सोमवारी 30 रोजे पूर्ण होऊन मंगळवारी ईद साजरी करण्यात आली.
बोहरा बांधवांकडून रमजान ईद साजरी करण्यात आली. धार्मिक पारंपरिक पध्दतीनुसार या समाजाची दिनदर्शिका मिस्त्र कालगणनेवर आधारलेली आहे. त्यामुळे या समाजाचे सण उत्सव चंद्रदर्शनावर अवलंबून नसते. अमावस्येनंतर पुढील महिना मोजला जात असल्यामुळे एक दिवस अगोदर या समाजाची ईद साजरी झाली. आज सकाळी 6 वाजता बोहरा मशिदीत नमाज पठण करण्यात आले. त्यानंतर बोहरा बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्यात. या वेळी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रमही झाले. या वेळी शेकडो बोहरा समाजबांधव उपस्थित होते. दरम्यान, ईदच्या नमाजपठणानंतर समाजबांधवांनी शिरखुर्मा तयार करुन आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार केला.
