भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वराडसीम गावात पोळा सणाची साजरी होणारी परंपरा केवळ धार्मिक नव्हे, तर सांस्कृतिक गौरवाची एक जिवंत साखळी आहे. तब्बल साडेचारशे वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावर्षी विशेष म्हणजे वेळेवर झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंद आणि समाधानाचं वातावरण पाहायला मिळालं.

वराडसीम गावात पोळा साजरा करण्याची पद्धत ही अत्यंत आगळीवेगळी आणि उत्साहवर्धक आहे. गावातल्या मानाच्या बैलाला पोळा फोडण्याचा मान दिला जातो. विशेष म्हणजे या मानाच्या बैलाला गावाच्या प्रवेशद्वारावर बांधलेल्या अडीच फूट उंच खिडकीतून उडी मारून पोळा फोडावा लागतो. नारळाचं तोरण बांधून वाद्यांच्या गजरात संपूर्ण गाव पोळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झालं होतं. या शर्यतीसाठी शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता असते की यंदा कुणाचा बैल पोळा फोडणार?

ही परंपरा नारायण पाटील नावाच्या एका शेतकऱ्याने साडेचारशे वर्षांपूर्वी सुरू केली होती. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या खर्चाने गावाचा प्रवेशद्वार उभारला होता, ज्यातून आजही पोळा फोडण्याची ही परंपरा सुरू आहे. पोळा फोडल्यानंतर मानाच्या बैलाच्या मालकाचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार केला जातो, हा भाग गावाच्या मानपानाचाच अविभाज्य भाग बनला आहे.
पोळा सणाच्या निमित्ताने गावभर बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती. सजवलेले बैल, ढोल-ताशा, लेझीम आणि पारंपरिक वेशभूषा या साऱ्यांनी वातावरण भारावून गेलं होतं. गर्दीच्या नियंत्रणासाठी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व शांततेत पार पडला.



