जळगाव प्रतिनिधी । रूहते हिलाल समितीची सभा शहरातील जामा मशिदीत पाहर पडली. यात शनिवारी येणारी ईद ही घरीच साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले.
याबाबत वृत्त असे की, रुहते हिलाल कमेटीची सभा जामा मशीद येथे मौलाना उस्मान कासमी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात ईद उल अझहा म्हणजेच बकरी ईद शनिवार दिनांक १ ऑगस्ट रोजी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे ईदगाहमध्ये नमाज होणार नसून, प्रत्येकाने घरीच नमाज अदा करावी, असा निर्णय घेण्यात आला.
याप्रसंगी ईदगाहचे सरचिटणीस फारूख शेख; ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक यांनी मनोगत व्यक्त केले. तर शहर ए काझी मुफ्ती अतिकुररहेमान यांनी कुर्बानीचे महत्त्व विशद केले. या सभेत सर्वानुमते कुर्बानीमुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखवता कामा नये, स्वच्छता ठेवावी व कोरोना हा संपूर्ण जगातून नष्ट व्हावा यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करावी असे ठरले. तसेच ईद हा सण घरीच साजरे करण्याचे आवाहन देखील करण्यात आले.
याप्रसंगी मौलाना उस्मान कासमी, मुफ्ती अतिकुर रहेमान, मौलाना झाकीर, मौलाना अख्तर नदवी, मौलाना नासिर, हाफिज रेहान, हाफिज वसीम, कारी सयद झाकीर, कारी शाफिक पटेल, मौलाना अबुझर, सयद चाँद, सयद मुश्ताक अली, अश्फाक बागवान, मुकीम शेख, अनिस शाह, ताहेर शेख, डॉ. जावेद शेख, मोहम्मद एजाज, इनायतुल्लाह खान यांची उपस्थिती होती.