जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील सर्व शाळामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सी.सी.टी.व्ही लावण्याची सूचना राज्य शासनाने दिली आहे. आम्ही जिल्ह्यातील गोरगरीबांची मुल, मुली ज्या जिल्हा परिषद शाळेत शिकतात तिथे सी.सी.टी.व्ही लावणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.आज जिल्हा नियोजन भवन मध्ये जिल्ह्यातील सर्व विभागाच्या चालू वर्षाच्या नियोजन निधीच्या खर्चाच्या संदर्भात आढावा बैठक घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते.
आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व यंत्रणांनी मंजुर कार्माच्या 100 टक्के वर्क ऑर्डर 31 सप्टेंबर पर्यंत पूर्ण कराव्यात असे निर्देश देऊन सन 2024-25 अंतर्गत दिनांक 5 सप्टेंबर 2024 पुर्वी जिल्हा परिषदेने उर्वरित 100 टक्के कामांना प्रशासकीय मान्यता द्याव्यात अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. राज्य शासकीय यंत्रणांनी दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत 100 टक्के कामांना प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकडे सादर करावेत जेणेकरुन आचारसंहितेपुर्वी कामे कार्यारंभ आदेश देऊन कामं सुरु करता येऊ शकतील.
मागील कालावधीत ज्याप्रमाणे आपले सर्वांचे सहकार्य लाभले व 100% निधी खर्च झाला त्याप्रमाणे येत्या काळातही आपण सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले. मंजूर कामे दर्जेदार व मुदतीत पुर्ण करुन प्रशासकीय दिरंगाई व कामाच्या गुणवत्तेतील चालढकल खपवून घेतली जाणार नाही असे सांगून जिल्ह्यातील ओ.डी.आर.आणि व्ही. आर. रस्त्यांच्या दर्जोंन्नतीसाठी च्या कामांचे प्रस्तावशासनाकडे तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
प्रलंबित असलेली व खासदार, आमदार आणि नव्याने सुचविलेली कामे मार्गी लावावीत. महावितरण, वन विभाग, अंगणवाडी बांधकामे, कौशल्य विकासची कामे, परिवहन विभाग यांच्याकडील कामे तात्काळ मंजूर करावेत अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. ज्या प्रमाणे “मुख्यमंत्री लाडकी बहिण” योजने अंतर्गत तळागाळातील सर्वसामान्य भगिनांना लाभ रक्षाबंधनची भेट म्हणून लाभ मिळण्यासाठी व लखपती दीदी कार्यक्रमासाठी सर्व यंत्रणांनी व लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले त्याच प्रमाणे मुख्यमंत्री वयोश्री योजना व तीर्थदर्शन कार्यक्रम योजनांचा वृद्धांना लाभ मिळावा याकरीता या योजनांची सक्षमतेने अंमलबजावणी असे निर्देशही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व विभागाच्या कामाचे सादरीकरण करून विविध विभागांना कामाचा वेग वाढविण्याची सूचना दिली.