जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातून गुरे चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. यातील तीन जणांना पोलीसांनी अटक केली असून पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसात गुरे चोरीचे गुन्हे वाढल्याने पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी गुन्हे उघडकीला आणण्याचे सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पथक तयार केले. त्यात पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, पोहेकॉ अश्रफ शेख निजामुद्दीन, सुधाकर अंभोरे, चालक पोहेकॉ विजय चौधरी असे पथक तयार केले.
अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी शाकीर शहा उर्फ पप्पू बंब इब्राहीम शहा (वय-३१) रा. आजाद नगर, भोईवाडा धुळे हा असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने संशयित आरोपीला धुळ्यातून अटक केली. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने साथीदार सद्दाम उर्फ बोबड्या रशीद शेख (वय-२०) रा. बाबानगर धुळे, नईम शहा सलीम शहा (वय-२५) रा. भोईवाडा, वडजी रोड, धुळे आणि सलमान ऊर्फ मन्या अन्सारी रा. काबीरगंज धुळे असे नावे सांगितले. त्यापैकी शाकीर शहा, सद्दाम शेख आणि नईम शहा या तीन जणांना स्थानिक गुन्हे पथकाने अटक केली आहे. तर सलमान ऊर्फ मन्या अन्सारी हा फरार आहे. त्याचाही शोध सुरू आहे. अटक केलेल्या तिघांना अमळनेर पोलीस यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.