जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उपविभागीय महसूल अधिकारी (प्रांतधिकारी) यांच्या स्वाक्षरीने देण्यात येणारे जात प्रमाणपत्र वाटपात जळगाव जिल्ह्यात मागील सात महिन्यात सूपरफास्ट कामकाज झाले आहे. मागील सात महिन्यात एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गातील ६५ हजार १४२ जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना, नोकरीसाठी तरूणांना, घरकुल व महाडीबीटी शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेत जात प्रमाणपत्र मिळाल्याने फायदा झाला आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सर्व महसूल यंत्रणेचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अभिनंदन केले आहे.
जिल्ह्यात १५ तालुक्यांतील नागरिकांसाठी ६ उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांमार्फत जात प्रमाणपत्र वाटपाचे कामकाज केले जाते. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) व इतर मागास प्रवर्ग (OBC) जात प्रमाणपत्र वाटपात जळगाव जिल्ह्यात मागील वर्षाच्या (एप्रिल २०२२ – मार्च २३) तुलनेत यावर्षीच्या एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२३ च्या सात महिन्यात ५२ टक्के अधिक कामकाज झाले आहे. मागील वर्षी दररोजचे सरासरी २०० जात प्रमाणपत्र वाटप होत होते. तर यावर्षी दररोजचे सरासरी ३०६ जात प्रमाणपत्र वाटप होत आहेत. मागील आर्थिक वर्षात २०२२-२३ मध्ये एकूण ७३२१७ जात प्रमाणपत्रांचे वाटप झाले. तर एप्रिल २०२३ नंतरच्या सात महिन्यात ६५१४२ जात प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. चालू आर्थिक वर्षातील अजून पाच महिने शिल्लक आहेत. उपविभागीय अधिकारी जात प्रमाणपत्र समित्यांचे कामकाज असेच सुपरफास्ट चालले तर पुढील पाच महिन्यांत ४५ हजार जातप्रमाणपत्र वाटपाची शक्यता आहे.
“जात प्रमाणपत्रामुळे लोक वेगवेगळ्या शासकीय विभागांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करू शकतात. जात प्रमाणपत्रामुळे रमाई, शबरी आणि प्रधानमंत्री आवास या गृहनिर्माण योजनांच्या लाभार्थ्यांची पहिली यादी वेळेत मंजूर होऊ शकते. जळगावमधून जास्त जण उच्च शिक्षणासाठी आणि सरकारी नोकरीसाठी अर्ज करत आहेत हे जात प्रमाणपत्रांच्या वाटपाच्या वाढलेल्या संख्येवरून दिसून येत आहे. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी परिश्रम घेऊन वेळेत व योग्य प्रमाणपत्रे दिली आहेत.” अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
पाच वर्ष सात महिन्यात ३ लाख जात प्रमाणपत्रांचे वाटप
उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जळगाव जिल्ह्यातील २०१८-१९ मध्ये १३६२१, २०१९-२० मध्ये ५७७५६, २०२०-२१ मध्ये ४२६१९, २०२१-२२ मध्ये ५४२६६, २०२२-२३ मध्ये ७३२१७ व एप्रिल २०२३- ऑक्टोबर २०२३ पर्यंत ६५१४२ प्रमाणपत्रांचे असे एकूण ३०६६२१ जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व कुणबी प्रमाणपत्र वाटपात गती
जिल्ह्यात जात प्रमाणपत्रांसाठी आवश्यक कागदपत्रे व ऑनलाईन प्रक्रियेविषयी मोठ्या प्रमाणात जागृती झाल्याने जात प्रमाणपत्र वाटपात पारदर्शकता व गती आली आहे. २०२३ या वर्षातील सात महिन्यात अनुसूचित जातीचे ८२५९, अनुसूचित जमाती – ७८६१, कुणबी – २४१८६ जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत.