Home क्राईम खानापूर टोलनाक्याजवळ ८ लाखांची रोख रक्कम लंपास, कर्मचाऱ्यांवर संशय

खानापूर टोलनाक्याजवळ ८ लाखांची रोख रक्कम लंपास, कर्मचाऱ्यांवर संशय


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बुऱ्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर खानापूर टोलनाक्याजवळ घडलेल्या थरारक रस्तालुटीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी तब्बल ८ लाख ५ हजार ६३० रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणात दुकान मालकाने थेट आपल्या दोन कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त केल्याने प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील व्यापारी दिपक सुरेश धर्मानी यांचे ‘सुरेशकुमार ॲन्ड सन्स’ नावाचे दुकान असून, ड्रायफ्रूट व्यवसायाच्या मार्केटिंग व वसुलीसाठी गौरव कैलास वाघ आणि मोहंमद तौफिक रफीक तेली या दोघांची नेमणूक करण्यात आली होती. हे दोघे फैजपूर, रावेर आणि सावदा परिसरात मालाची वसुली करून परतीच्या मार्गावर होते.

दि. ६ रोजी शुक्रवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास वसुलीची रक्कम असलेली बॅग घेऊन ते युनिकॉर्न दुचाकी (क्र. MP 68 ZA 5547) वरून मध्य प्रदेशकडे जात असताना खानापूर टोलनाक्याजवळ मागून आलेल्या एका मोटारसायकलस्वाराने अचानक कट मारला. यामुळे दुचाकी घसरून पडली आणि त्याच क्षणी मागून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांपैकी दोघांनी खाली उतरून पैशांनी भरलेली बॅग उचलली व घटनास्थळावरून पसार झाल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला.

घटनेनंतर गौरव वाघ आणि मोहंमद तौफिक यांनी मालक दिपक धर्मानी यांना घटनेबाबत समाधानकारक माहिती दिली नाही. तसेच त्यांच्या उत्तरांमध्ये विसंगती आढळून आल्याने आणि उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने धर्मानी यांचा संशय अधिक बळावला. परिणामी, दुकानात काम करणाऱ्या या दोघांविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही रस्तालूट बाहेरील अज्ञात चोरट्यांनी केली की दुकानातील कर्मचाऱ्यांनीच कट रचून हा प्रकार घडवून आणला, याबाबत अद्याप स्पष्टता नसून, संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कर्मचारी सुनील वंजारी करीत असून, लवकरच सत्य समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound