जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चिंचोली (ता. यावल) येथे बियर न दिल्याच्या कारणावरून थेट हॉटेल मालकावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी यावल पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी तात्काळ भेट देत परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. जखमी हॉटेल मालकाची प्रकृती सध्या स्थिर असून, आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
घटना गुरुवारी, दिनांक १० जुलै रोजी रात्री ९ ते ९.३० च्या सुमारास चिंचोली येथील आडगाव फाट्याजवळ असलेल्या ‘हॉटेल रायबा’ येथे घडली. या हॉटेलवर दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने बियर मागितली. हॉटेल मालकाने हॉटेल बंद असल्याचे सांगून त्याला जवळच्या गावात जाण्याचा सल्ला दिला. मात्र यामुळे संतप्त झालेल्या त्या तरुणाने थेट पिस्तुल काढून मालक प्रमोद श्रीराम बाविस्कर (वय ४०, रा. पुनगाव, ता. चोपडा, सध्या मुक्काम चंदू अण्णा नगर, जळगाव) यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात एक गोळी त्यांच्या छातीत व दुसरी उजव्या खांद्यावर लागली. त्यावेळी प्रमोद बाविस्कर आपल्या कार (क्रमांक MH 19 CF 3353) मध्ये मित्र रतन रमेश वानखेडे (रा. किनगाव खुर्द) यांच्यासोबत होते.

गोळीबार केल्यानंतर आरोपी दुचाकीवरून किनगावच्या दिशेने फरार झाले. गंभीर जखमी अवस्थेत बाविस्कर यांना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावल पोलिसांनी रतन वानखेडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपासासाठी शुक्रवारी डिवायएसपी अण्णासाहेब घोलप व पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या नेतृत्वाखाली धानोरा व किनगाव परिसरातील मुख्य महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सखोल तपासणी करण्यात आली. आरोपींचा माग काढण्यासाठी ही फूटेज अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सध्या या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस उपनिरीक्षक एम. जे. शेख व हवालदार वासुदेव मराठे यांच्या पथकाकडून सुरू असून, घटनास्थळी मिळालेली माहिती आणि सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी लवकरच गजाआड होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



