भीषण अपघातात तरूणाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल !


चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरातील चहार्डी शिवारात असलेल्या साखर कारखान्याच्या मागील रस्त्यावर एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या एका लाल रंगाच्या कारने दुचाकीला समोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात १९ वर्षीय दिक्षांत पाटील या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चेतन उदय भदाणे (वय १८, रा. भोईवाडा, चोपडा) आणि त्याचा मित्र मयत दिक्षांत दीपक पाटील (रा. अकुलखेडा) हे दोघे ९ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीने (क्रमांक MH-19-EL-5700) धरणगाव तालुक्यातील अहिरे येथून अकुलखेड्याकडे जात होते. चहार्डी ते निमगव्हाण दरम्यान असलेल्या ज्ञानेश्वर पाटील यांच्या शेताजवळ रस्त्याच्या वळणावर ही घटना घडली.

समोरून येणाऱ्या लाल रंगाच्या टाटा टिगो कारने (क्रमांक MH-41-BH-5087) रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत, भरधाव वेगात दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दिक्षांत पाटील याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच प्राण गेला. फिर्यादी चेतन भदाणे हा देखील या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.

कार चालकावर गुन्हा दाखल या प्रकरणी पोलिसांनी कार चालक भटू अशोक पाटील (वय ३२, रा. धामणगाव, जि. धुळे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण पाटील करत आहेत.