जळगाव (प्रतिनिधी) महापालिकेतील अधिकारी हे विधवा महिला कर्मचाऱ्यांकडे शरीर सुखाची मागणी करत असल्याने पीडित महिलेने आयुक्तांकडे २८ मार्च रोजी तक्रार अर्ज सादर केला होता. यानुसार महापालिकेतील महिला तक्रार निवारण समितीने सुनावणी घेऊन पीडितेचा लेखी जबाब नोंदवून घेतला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार लेखी जबाबात पीडित महिलेने म्हटले आहे की, तिची मागील ४ वर्षांपासून सफाई कामगार म्हणून नेमणूक असून मागील १ वर्षांपासून युनिट क्र. ९ येथे कार्यरत आहे. मनपातील अधिकारी आनंद सोनवल व अतिक्रमण अधीक्षक एच.एम.खान यांचे नियंत्रण त्यांच्या कामांवर आहे. हे दोघे अधिकारी युनिट कार्यालयात तिला बोलवून घेत कामांत चूका काढून लज्जा उत्पन्न होईल, असे बोलत. तसेच अश्लील हावभाव करतात. एकेदिवशी त्यांनी दुपारी २ वाजेनंतर युनिट कार्यालयात बोलवून शरीस सुखाची मागणी केली. गरीब कुटुंबातील असल्याने भीती पोटी याची तक्रार केली नाही. परंतु याबाबत सहकारी, मुकादम व मानलेले मामा यांना सर्व हकीगत सांगितली. डिसेंबर २०१८ मध्ये आनंद सोनवल याने व्हाट्सअपद्वारे शरीर सुखाची मागणी केली. ही सर्व हकीगत तिने आपल्या सहकाऱ्यांना व मुकदमला मोबाईल दाखवून सांगितली. याची खबर सोनवल व खान यांना झाल्याने त्यांनी कार्यालयात बोलवून धमकी देऊन त्यांनी स्वतः मोबाईल मधील मेसेज डिलीट केलेत. यानंतरही त्यांनी मानसिक त्रास देणे सुरूच ठेवले. पिडीत महिलेने गरज पडल्यास तिच्या सहकाऱ्यांना साक्षीदार म्हणून हजर करण्याची तयारी दर्शवली आहे. या दोघां अधिकाऱ्यांना ताकीद देण्यात यावी व त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील या लेखी जबाबात पिडीते महिलेने केली आहे.