जळगाव प्रतिनिधी । कारागृहातून तिघांना पलायन करण्यासाठी मदत करणाऱ्या जगदीश पुंडलिक पाटील (वय-१८) रा. पिंपळकोठा ता.पारोळा याला पोळीतून काडतूस पुरविणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला असून आणखी एक जण रडारवर येईल असा विश्वास पोलिसांना आहे. काडतूस पुरविणारा हा अमळनेर शहरातील रहिवाशी आहे.
२३ जुलै रोजी या संशयिताने जगदीश याला अमळनेरात काडतूस पोहचकेली व त्यानंतर जगदीश हे काडतूस घेऊन कारागृहात आला होता. गुंडाळलेल्या पोळीत काडतूस टाकून ती त्याने गणेश नगराकडून फेकली होती असेही तपासात उघड झाले आहे. २५ जुलै रोजी सुशिल अशोक मगरे, गौरव विजय पाटील, सागर संजय पाटील या तीन बंदींनी कारागृहातून फिल्मीस्टाईल पलायन केल्याची घटना घडली होती.
प्रकरणात जगदीश याला रविवारी रात्री सुरतला पळून जात असतांना स्थानिक गुन्हे शाखेने धुळे – साक्री रस्त्यावर बसमधून अटक केली होती. सध्या तो ३१ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत आहे. कोठडीत असतांना त्याने अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. कारागृहात असलेल्या तिघांना जगदीश यानेच गावठी पिस्तूल पुरविले असून त्याने हे पिस्तूल कोठून आणले, पिस्तूल पुरविणारे कोण ? अजून कोणाचा सहभाग आहे का? याची चौकशी पोलीस अधिकारी करीत आहे.
अल्पवयीन असतांना गंभीर गुन्हा दाखल
दरम्यान, जगदीश याचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. अल्पवयीन असतांना त्याच्याविरूध्द जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. पिंपळकोठा येथील यात्रेत जगदीश याने एकावर चाकू हल्ला केला होता. तेथून पलायन केल्यानंतर त्याच रात्री जगदीश, गौरव विजय पाटाल, सागर संजय पाटील यांनी अमळनेर-धुळे रस्त्यावर सरकारी अधिकाऱ्याची कार आडवून पिस्तूलाचा धाक दाखवत लुटले होते. दरम्यान पलायन केलेल्या संशयितांच्या रडारवर पोलीस असून त्यांच्या परिवाराचीही कसून चौकशी केली जात आहे. सुशिल मगरे यांची आइ व पत्नी यांचीही चौकशी करण्यात आली.