Home क्राईम अवैध गोमांस वाहतूक करणारी कार पलटी, दोघे ताब्यात, इतर फरार !

अवैध गोमांस वाहतूक करणारी कार पलटी, दोघे ताब्यात, इतर फरार !


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरापासून जवळ असलेल्या नशिराबाद गावाजवळील मुंजोबा मंदिरासमोर शुक्रवारी सकाळी अवैध गोमांस वाहतूक करणाऱ्या एका कारचा अपघात झाला. ही कार पलटी झाल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि कारची तपासणी केली. यावेळी कारमध्ये सुमारे २५० किलो गोमांस आढळले. पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, इतर तीन आरोपी फरार झाले आहेत.

शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास नशिराबादकडून भुसावळकडे जाणारी ‘एमएच १९ बीयू ९९५७’ क्रमांकाची अर्टिगा कार मुंजोबा मंदिरासमोरील रस्त्यावर पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कारची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात गोमांस असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी सांगितले की, कारमध्ये अंदाजे २५० किलो गोमांस होते. या घटनेनंतर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, या कारमधील इतर तीन जण अपघातानंतर लगेचच घटनास्थळावरून पसार झाले. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी गोमांसासह कार जप्त केली असून, याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound